गेली कित्येक वर्षे मला हे पुस्तक वाचावेसे वाटत होते. या संचारबंदी मुळे हा योग जुळून आला. शरद पोंक्षेच्या नावाने एक संदेश फिरवला जात होता जिथे ते म्हणत की या संचारबंदीत “माझी जन्मठेप” वाचायला घ्या. ठरवले. पण पुस्तक माझ्याकडे नव्हते. आता काय? तेव्हाच लक्षात आले की काही दिवसांपूर्वी मला या पुस्तकाचे ध्वनिमुद्रण केलेले युट्यूब लिंक सापडले. ते ऐकायला सुरू करताच सावरकरांच्या संकेतस्थळावर पीडिएफ पण सापडले. ध्वनिमुद्रित केलेले पुस्तक वाजवून आणि पुढे पीडिएफ ठेवून ते वाचू लागलो.
एका व्यक्तिच्या आयुष्यात किती हे त्रास? किती म्हणून एका माणसाची सहनशक्ती? हे दोन प्रश्न सर्वात आधी माझ्या मनात आले. पुस्तकाच्या पहिल्या पानापासून जी पीडा कथित केली आहे ती शेवट पर्यंत तशीच आहे. कधी कधी थोडी मात्रा वर खाली होते. पण शून्य कधीच नाही. सावरकरांनी दहा वर्षे अंदमानात अपार शारीरिक आणि मानसिक यातना सहन केल्या. जिथे एका बाजूला धडधाकट व्यक्ती या यातना सहन न होवून वर्ष दोन वर्षांतच आत्महत्या करीत किंवा त्यांचा मृत्यू होई तिथे दहा वर्षे काढणे एक चमत्कारच.
हे सगळं सहन करण्यामागे एकच गोष्ट कारणीभूत. ती म्हणजे प्रचंड राष्ट्रप्रेम. आपल्या राष्ट्रासाठी जगावे, स्वातंत्र्य मिळवून राष्ट्राची प्रगती करावी हे ध्येय. समाजात बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी कारागृहात असतानाच प्रयत्न सुरू केले. कैद्यांना शिक्षण, वाचनाची आवड निर्माण करणे, राजकारणाची समज. शुध्दिकरण इ. यासारखे अनेक उपक्रम त्यांनी राबविले. बहुतांश वेळा त्यांना या उपक्रमात यश सुध्दा मिळाले.
पुस्तक वाचताना सावरकरांच्या चिवट इच्छाशक्तीची आणि मनोधैर्याची जाणीव होते. खून, दरोडा घातलेल्यांना, आपल्या नंतर कारावास झालेल्यांना लवकर सुटका मिळल्यावर काय वाटत असेल त्यांना? सर्व बदिंना काही ना काही सुट मिळत असे पण त्यांना नाही. अगदी अंदमानातून सुटका झाल्यानंतर सुध्दा भारतात तीन वर्षे कारावास सहन केल्यानंतर सुटका झाली.
शेवटी शेवटी अजून एक गोष्ट जाणवली की भारताने एक दूरदृष्टी असलेल्या या नेत्याला म्हणावे ते स्थान आणि महत्व दिले नाही.
आता संचारबंदी लागू असताना हे पुस्तक वाचल्याने त्याचा वेगळा प्रभाव पडला. आपण जे सहन करतोय ते काहीच नाही असे वाटू लागले. मराठी वाचता येत असेल तर नक्कीच वाचा. तुमचा दृष्टिकोन बदलणारे पुस्तक ठरेल हे.