Manat – Book Review

मनात

मानसशास्त्र हा असा विषय आहे ज्याच्यावर एवढी वर्षे दुर्लक्ष होत होते. पण जसजसा काळ बदलला, जीवनशैली बदलली तसे याला महत्त्व मिळत गेले. मला मानसशास्त्राविषयी खूपच ओढ. लोकांच्या नकळत त्यांचे बोलणे, त्यांचे हावभाव यांचे निरीक्षण करत असतो. एवढं असूनही या विषयावर कधी वाचन केले नाही.

मनात हे पुस्तक सामान्य माणसाला मानसशास्त्राची माहिती देण्यासाठी लिहिले गेले. मानसशास्त्राचे वेगवेगळे पैलू यात मांडले आहेत. भाषा रंजक ठेवण्याचा लेखकाने अत्यंत प्रामाणिक प्रयत्न केला आहे. पण सुरुवातीच्या काही प्रकरणानंतर तोचतोचपणा जाणवतो. प्रत्येक प्रकरण एकाच साच्यात घालून तयार केले आहे असे वाटते. मधल्या पानांत तर मानसशास्त्र सोडून मानसशास्त्रज्ञांच्या जीवनाविषयी जास्त पाने खर्च केली आहेत. यामुळे सुरुवातीला आपले लक्ष वेधून घेणारे हे पुस्तक नंतर नंतर कंटाळवाणे होऊ लागते. असे असूनही या पुस्तकात मानसशास्त्राविषयी प्रचंड माहिती दिली आहे. जवळपास या विषयाचा संपूर्ण इतिहास संक्षिप्त स्वरूपात मांडला आहे.

ज्यांना मानसशास्त्राची आवड आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक एक पर्वणीच. बाकीच्यांना हे कंटाळवाणे वाटण्याची संभावना आहे. वाचायचं ठरवलंच तर हळूहळू वाचा. कारण यात घेण्यासारखे खूप काही आहे.