जेवणाची चव ते करणाऱ्याच्या भावनांवर अवलंबून असते. म्हणूनच घरातल्या जेवणाला चव असते. बहुतेक वेळा.. म्हणजे जेव्हा चव बिघडते तेव्हा समजायचं की “भांडे” जास्त गरम झाले होते. लंडनमध्ये रहाणार्या आदित्यला अस्सल पुणेरी शाकाहारी स्वयंपाक शिकायचाय. तो आपली नोकरी सोडून पुण्यातील मित्राकडे रहायला जातो. त्यांच्या जेवणाच्या डब्यातील गुलाबजाम खाऊन त्याला आपल्या बालपणाची आठवण होते. विचारपूस केल्यानंतर, आदित्य राधाकडे जेवण शिकायला लागतो. इथे कथेत पुणेरी टोमणे हसायला भाग पाडतात. त्यानंतर जो काय अप्रतिम कॅमेरा वापरलाय… अहाहा!! ते जेवणाचे पदार्थ तोंडाला पाणी आणतात व त्या पदार्थांना बघून डोळे सुखावतात. जेवणातील पदार्थ, साहित्य यांच्या उपमा देऊन सुंदर तत्वज्ञान मांडलंय. कथेला अनुसरून लिहिलेले संवाद वाखाणण्याजोगे आहे. चित्रपटाची मांडणी फारच मजेशीर आहे व कुठेच कंटाळा येत नाही. सिध्दार्थ चांदेकर आणि सोनाली कुलकर्णीने प्रभावी व्यक्तीमत्वं साकारली आहे. एकंदरीत हा चित्रपट एकदा बघून समाधान होणे शक्य नाही. एकदा तरी चव चाखून बघाच… ९/१०