संदीप खरेंची आणि माझी ओळख जवळ जवळ दहा वर्षांपासून… म्हणजे आम्ही प्रत्यक्ष भेटलो नाही. पण त्यांच्या कवितांची आणि माझी. लेखनातून माणसाची ओळख – पारख सहज शक्य आहे. म्हणूनच म्हटलं की मी त्यांना एवढी वर्षे ओळखतो. “मौनाची भाषांतरे” वाचता वाचता दहा वर्षांपूर्वीचा मी आठवलो. खूप काही बोलायचं होतं. पण शब्दच सापडत नसत. अशात, संदीप खरेंनी माझ्या काही भावनांना नां शब्द दिले. हे एका दशकापूर्वी लिहिलेले पुस्तक आज पुर्ण वाचून काढले.
असे वाटले की मी हे पुस्तक तेव्हाच वाचायला पाहिजे होते. त्या अव्यक्त विचारांना मोकळीक मिळाली असती. विचारांची घुसमट होउन मन वैफल्यग्रस्त झाले नसते. दोन ‘मी’ या कवितेचे गीत स्वरूप त्यावेळी मी रिपीट मोडवर ठेवायचो. दिवस असे की, अवयव, आताशा असे हे, नास्तिक या कविता मनात घर करतात. या घरांची दारं सताड उघडी असतात. गरज फक्त आपणच भेट देण्याची ..
अजूनही काहीवेळा व्यक्त करताना अडखळतो. किंबहुना, मला लंगडा असल्यागत वाटते. अशात कुणीतरी लिहिलेल्या कविता माझ्या कुबड्या बनतात. योग्यवेळी, योग्य ठिकाणी शब्दांची साथ मिळाली व ती भावना व्यक्त झाली की बस्स!!